नायलॉन,मोनोकाइट मांजाचा धोका; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाढते अपघात…
पुणे: शहरात नायलॉन मांजाच्या वापरामुळे गंभीर अपघातांची मालिका सुरू असून काही नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. कोंढवा बुद्रुक परिसरात अशाच घटनांमध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने पतंग उडवताना नायलॉन मांजाचा आणि मोनोकाइटचा सर्रास वापर होत आहे. विशेषतः मोनोकाइट हा मूळतः मासेमारीसाठी वापरला जाणारा धागा आहे, परंतु तरुणाई त्याचा पतंग उडवण्यासाठी उपयोग करत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, जसे की इंस्टाग्राम आणि फेसबुकवर मोनोकाइटच्या विक्रीच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर होत आहेत, ज्यामुळे त्याचा वापर नियंत्रित करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
२०१७ पासून नायलॉन मांजाच्या उत्पादन, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली असूनही, तो अजूनही शहरात खुलेआम विकला जात आहे. प्रशासन आणि पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे अशा विक्रीला आळा घालण्यात अपयश येत आहे. गेल्या पाच वर्षांत पुण्यात फक्त १६ गुन्हे नोंदवले गेले आहेत. २०२३ मध्ये सर्वाधिक ७ गुन्हे नोंदले गेले, तर २०२४ मध्ये केवळ ४ गुन्हे नोंदवले गेले असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, अशा घटनांना रोखण्यासाठी अद्याप ठोस उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत.
नायलॉन मांजाचा धोका केवळ मानवांपुरता मर्यादित नाही, तर झाडांवर आणि रस्त्यांवर अडकलेल्या धाग्यामुळे अनेक पक्षी गंभीर जखमी होतात. काचेचा लेप असलेल्या धाग्यामुळे त्यांच्यावर मोठा परिणाम होत असून पर्यावरणालाही मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी प्रशासनाकडे कठोर उपाययोजनांची मागणी केली आहे.
नायलॉन मांजाचा धोका थांबवण्यासाठी विक्रेत्यांसाठी कडक नियमावली तयार करणे गरजेचे आहे. मोनोकाइट आणि नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी ग्राहकांची नावे आणि आधार कार्डची माहिती नोंदवून ती रजिस्टरमध्ये साठवणे बंधनकारक करणे आवश्यक आहे. याशिवाय सोशल मीडियावरील जाहिरातींवर त्वरित बंदी घालून, विक्रेत्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून या धोकादायक मांजाचा वापर टाळण्याचे आवाहनही महत्त्वाचे आहे.
मकर संक्रांतीचा सण सुरक्षित आणि आनंददायक साजरा करण्यासाठी प्रशासनाने या धोकादायक मांजाच्या विक्रीवर कठोर नियंत्रण आणणे आणि लोकांच्या सुरक्षेसाठी तत्काळ पावले उचलणे आवश्यक आहे.